मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात अंमलात आलेल्या ‘शिवभोजन थाळी’ने आतापर्यंत तब्बल 11 कोटी गरजूंची भूक भागवली. आता ठाकरे सरकारने काही काम केलेले नाही, असे बोलणारे तोंडावर आपटले आहेत.
दिवसागणिक वाढणाऱया महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आणि गोरगरीबांना चूल पेटवणेही शक्य नसताना शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी’ने आतापर्यंत तब्बल 11 कोटी गरजूंची भूक भागवली आहे.
फक्त 10 रुपयांत मिळणाऱया या ‘शिवभोजना’मुळे गोरगरीबांना मोठा आधार ठरत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राज्यात शिवसेना सत्तेत आल्यानंतर गोरगरीबांना अल्प दरात सहज पोटभर जेवण मिळावे यासाठी ‘शिवभोजन थाळी’ उपक्रम सुरू करण्यात आला. 20 जानेवारी 2020 रोजी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. राज्याच्या विविध जिह्यांत 1555 केंद्रांवर ही थाळी मिळू लागल्याने गोरगरीबांना मोठा आधार ठरला आहे. या केंद्रावर आतापर्यंत 11 कोटी 43 लाख 16 हजार 770 जणांना या ‘शिवभोजना’चा लाभ मिळाला आहे.
केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर
केवळ 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्यात येत असल्याने काही वेळा या वाटप केंद्रावर गर्दी होते. शिवाय सुरक्षेचा प्रश्नही असतो. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांवर लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. शिवाय केंद्रापासून 100 मीटर क्षेत्रातील जास्तीत जास्त गोरगरीबांना या थाळीचा लाभ मिळावा यासाठी जिओ-फेसिंगच्या माध्यमातून सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.