मुंबई : शिवसेनेचे बारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर ठाकरेंसोबत राहिलेले मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकरही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. कीर्तिकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि या वृत्तावर जवळपास शिक्कामोर्तबच झालं. परंतु गजानन कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर ) यांनी पिताश्रींचे कान टोचताच त्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्याला वडिलांना विरोध केला. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटात आहे. अशावेळी आपण उद्धव साहेबांना सोडलं तर देव मला माफ करणार नाही, जगात माझ्यासारखा मतलबी माणूस सापडायचा नाही’ अशी भावना अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केली. त्यानंतर कीर्तिकरांनी आपला निर्णय बदलल्याचं वृत्त ‘सरकारनामा’ वेबसाईटने दिलं आहे.
दसरा मेळाव्यात आणखी एक शिवसेना खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. खासदार गजानन किर्तीकर यांच्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची घरी जाऊन विचारपूस केली होती. तर त्यानंतर कीर्तिकरही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेटीस आले होते. त्यामुळे कीर्तिकरांनी ठाकरेंना सोडणं जवळपास निश्चित मानलं जात होतं.
शिंदे गटाकडून गजाजन कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद तर सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. वयोमानापरत्वे गजानन कीर्तिकर पुढील निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचे बोलले जाते. मात्र ठाकरेंनी त्यांच्या मुलाला जबाबदारी देत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे संकेतच दिले आहेत.
कोण आहेत गजानन कीर्तिकर?
१९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहे
कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला.
ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.