मुंबई : नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला.
साश्रू नयनांनी निरोप
10 दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघालाय. पण यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळीअनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडून घेतलं आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लाल बागच्या राजाला निरोप दिलाय.