मुंबई : राज्यभरात लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप दिला जात आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी पुन्हा एकदा करोनापूर्व काळाप्रमाणे जल्लोषात आणि दीर्घकाळ चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अनेक मोठ्या मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन सुरू होते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा भक्तमंडळींमध्ये तोच उत्साह दिसून आला. मात्र, या उत्साहात अनेकदा वाद, भांडण, प्रसंगी बाचाबाचीपर्यंत देखील प्रकार गेल्याचं पाहायला मिळतं. दिंडोशीमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचेच दोन गट आमनेसामेन आल्यामुळे आसपासचे नागरिक बुचकळ्यात पडले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.
नेमकं झालं काय?
मुंबईच्या इतर भागांप्रमाणेच दिंडोशीमध्ये देखील गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, यावेळी भाजपा आमदार राजहंस सिंह आणि भाजपा पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. नेमका कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसली, तरी या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादावादी सुरू झाली. हे दोन्ही गट आमने-सामने भिडल्यामुळे परिसरात काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.