मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर येथेही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. नोकरदार कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने त्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
हवामान खात्याने पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल होती. तसंच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारी ४ वाजल्यानंतर अचानक ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही तुफान पाऊस पडत आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली होती. तर, मुंबईत उपनगरांत तुरळक सरी बरसल्या होत्या. मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता.
- मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. ५ मि.मी. ते १५ मि.मी. पावसाची नोंद झाली.