मुंबई : ऑनलाईन वाहन विमा सुविधा देणाऱ्या देशातील प्रसिद्ध कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही विमा एजंटविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विमा कंपनीचे सहाय्यक उपाध्यक्ष पद्माकर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार विमा कंपनी एका संकेतस्थळाच्या मदतीने ऑनलाईन विमा देते. त्यासाठी ग्राहकांना त्यांच्या गाडीची व इतर माहिती द्यावी लागते. २०२० व २०२१ मध्ये देण्यात आलेल्या विम्यांचे कंपनीने लेखापरीक्षण केले असता अनेक विम्यांसाठी मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, आयपी अॅड्रेस सारखेच असल्याचे निष्पन्न झाले. देशभरातील सुमारे १,१२९ विमादावे संशयास्पद आढळले. आरोपींनी आणखीही काही कंपन्यांची अशाच पध्दतीने फसवणूक केली असल्याचा संशय आहे.
चारचाकी वाहने दुचाकी दाखविली
काही विमा एजंटनी मिळून चार चाकी व तीन चाकी वाहन दुचाकी असल्याचे दाखवून त्यावर विमा घेऊन विमा कंपनी व ग्राहकांची फसवणूक केली आहे. आरोपींनी ग्राहकांना बनावट विमा कागदपत्रे घेऊन त्यांच्याकडून जास्त रक्कम घेतली. पण विमा कंपनीला मात्र दुचाकी विम्याच्या नावाखाली कमी पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी अशा प्रकारे एक कोटी ५३ लाख रुपयांची विमा कंपनीची फसवणूक केली.