(संतोष सकपाळ)
सासुरवासींनी-माहेरवासींनीचा आनंदमेळा
गणरायांच्या आगमनापाठोपाठ काल (३ सप्टेंबर २०२२) जेष्ठागौरींचे मोठ्या थाटात आगमन झाले. गौरी आगमन, गौरीपूजन हा माहेरवासीनींबरोबरच सासुरवासीनींसाठी मोठा आनंदमेळा असतो.
गौरी-गणपतीचा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी मालवण पट्ट्यात गौरीपूजन होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्या त्या गावच्या परंपरेप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो.
गौरीचा आकर्षक मुखवटा बसवल्याने आपण गौरीआवाहन झाले असे म्हणत असलो तरी गौरीपूजनात तेरड्याला फार महत्त्व आहे.
गुहागर तालुक्यातील तवसाळ गावी गौरी आगमनाची वेगळी प्रथा आहे. समुद्रकिनारी तेरड्याची पूजा करून गौरीला सजविण्याचा साज वाजतगाजत घरी आणण्यात येतो. त्यानंतर लाकडी खुर्चीवर तेरडा मांडून त्यावर मुखवटा बसविला जातो. गौरीला साडी नेसविण्यात येते. त्यानंतर आभूषणे चढविली जातात. सालंकृत केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये प्राण असल्याप्रमाणे ती जिवंत भासू लागते.
लग्न होऊन मुली सासरी गेल्या तरी गौरीच्या सणासाठी माहेरवासीनी म्हणून एक दिवस तरी आवर्जून येतात. गौरी आगमनापासून विसर्जनापर्यंत नाचगाणी, फुगड्यांचा खेळ आदी विविध कार्यक्रम होतात. त्यामुळे घरात, परिसरात एकप्रकारे चैतन्याचा जागर चालू असतो.