SBI ने वर्तवला अंदाज; भारत जर्मनी,जपान या मोठ्या देशांना टाकणार मागे
२०२९ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था जगभरात वेगाने वाढत आहे. २०१४ पासून केलेल्या संरचनात्मक बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने आता युनायटेड किंग्डमला (ब्रिटन) मागे टाकले आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. या बदलांमुळे सध्याच्या विकास दरानुसार भारत २०२७ मध्ये जर्मनी आणि २०२९ पर्यंत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या संशोधन अहवालात मोठे अंदाज बांधण्यात आले आहेत.
भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने अहवाल दिला की डिसेंबर २०२१ मध्ये ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. तर २०२९ पर्यंत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. या काळात भारतीय अर्थव्यवस्था सात स्थानांनी वाढली असून २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था क्रमवारीत १० व्या स्थानावर होती. एसबीआयचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाले की, सध्याच्या वाढीच्या दरानुसार भारताने २०२७ मध्ये जर्मनीला आणि २०२९ मध्ये जपानला मागे टाकले पाहिजे. ही एक मोठी उपलब्धी असेल.