शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सरकारी अधिकाऱ्यांना आता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमदार बांगर यांनी दुसऱ्यांदा एका सरकारी अधिकाऱ्याला दमात घेतले आहे. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबोडकर यांना आमदार बांगर यांनी फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना दमदाटी केली. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी याविरोधात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग संघटनेचे अध्यक्ष एकनाथ भाले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार बांगर यांना समज देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य संचालक डॉ. नितिन अंबोडकर यांना भ्रमणध्वनी केला, परंतु ते महत्वाच्या बैठकीमध्ये होते, त्यामुळे डॉ. अंबोडकर यांनी त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठविला, बैठकीनंतर स्वतः आमदार बांगर यांना भ्रमणध्वनी केला, परंतू आमदार यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु करत एका प्रामाणिक अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढत आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केली. वास्तविक पाहता, राज्यात सध्या आरोग्य विभागातंर्गत सर्वच वर्गामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी यांच्याकडे दोन दोन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. कोविडनंतर इतर सर्व योजनांचे कामकाजाबाबत केंद्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा घेतला जात आहे, त्यामुळे अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात मानसिक ताणतणावामध्ये दिसून येत आहे, असे असतानाही देशात आपले राज्याचे आरोग्य विभागाचे कामकाज निश्चित अग्रेसर आहे. या बंधपत्रित कंत्राटी अथवा बाह्य यंत्रणेमार्फत अधिकारी/कर्मचारी यांचे वेतनासाठी अनुदान प्राप्त होत नसल्याने त्यांचे वेतन विहीत कालावधीत होत नाहीत. त्यामुळे अधिकारी/कर्मचारी यांचेमध्ये नाराजी निर्माण होत आहे. आमदार बांगर यांचे वर्तन योग्य नाही. या घटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना या सर्व संघटना जाहीर निषेध करत आहे.