लोकल आणि ट्रॅकवर आडवा पडलेल्या ड्रममध्ये झालेल्या धडकेने ड्रम लोकलच्या खाली अडकला गेला. वेळीच जर लोकल थांबवली नसती, मोठा अनर्थ घडला असता. अखेर लोकल थांबल्यानंतर लोकलच्या समोरच्या बाजूला अडकलेला हा ड्रम बाजूला करण्यात आला.
दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीहून कल्याण फास्ट लोकल निघाली. मात्र भायखळा जवळ एक मोठा ड्रम रेल्वे ट्रॅकवर असल्याचं मोटरमनच्या निदर्शनास आलं. लोकल चालकाने वेळीच गाडीचा वेग कमी केला आणि ब्रेक लावून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. समोर सिग्नल ग्रीन असतानाही लोकलच्या मोटरमनने लोकल थांबवण्यासाठी ब्रेक मारले.
ब्रेक लावले, तरी…
मोटरमनच्या चालकाने धडक रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण ब्रेक लावेपर्यंत रेल्वे ट्रॅकवर असलेला ड्रम आणि लोकल यांची एकमेकांना धडक बसलीच. या धडकेच्या वेळी कर्णकर्कश आवाज झाला. त्यामुळे एकच घबराटही उडाली. दुपारची वेळ असल्याने लोकलमध्ये फारसे प्रवासी नव्हते. पण तरीही सगळेच धास्तावले. नेमकं काय झालं, कशाचा आवाज झाला, यावरुन प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली.
दरम्यान, लोकल आणि ट्रॅकवर आडवा पडलेल्या ड्रममध्ये झालेल्या धडकेने ड्रम लोकलच्या खाली अडकला गेला. वेळीच जर लोकल थांबवली नसती, मोठा अनर्थ घडला असता. अखेर लोकल थांबली. त्यानंतर लोकलच्या समोरच्या बाजूला अडकलेला हा ड्रम बाजूला करण्यात आला.
ड्रममध्ये काय, तो कुणी ठेवला?
प्रवाशांच्या मदतीने हा ड्रम बाजूला केल्यानंतर पाहणी करण्यात आली. त्यावेळी या ड्रममध्ये दगड ठेवण्यात आले होते, असं दिसून आलं. अखेर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून केला जातोय. हा ड्रम नेमका कुणी आणि का रेल्वे ट्रॅकवर ठेवला, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर यंत्रणांच्या मदतीने तपास केला जातोय.
प्रवाशांनी लोकलच्या मोटरमनचं कौतुक केलंय. अशोक कुमार शर्मा असं या मोटरमनचं नाव असून त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचलाय.