गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लसीची २०० ते ४०० असणार किंमत? पुनावाला यांनी दिली माहिती
गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही स्वदेशी लस विकसित केली असून, सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी आज १ सप्टेंबर रोजी ही लस लॉन्च करणार आहेत. कर्करोगासारख्या घातक अजारावर ही लस येत असल्याने ही लस सर्वांसाठी दिलासा असणार आहे.
दरम्यान, या लसीची किंमत किती असणार याबाबत चर्चा सुरू असताना सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी माहिती दिली आहे. गर्भशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत ही २०० ते ४०० रूपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र अद्याप किंमत निश्चित केली नसल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दोन वर्षांत २०० दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी असल्याचेही पुनावाला यांनी म्हटले आहे.
गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध
सध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आणि दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. जी सीरमने तयार केली आहे. हे हिपॅटायटीस बी लसीप्रमाणेच VLP Virus-like particles वर आधारित आहे. या लसीच्या आगमनामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होणार असून या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात भारत पाचव्या क्रमांकावर
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हे दुसरे सर्वांत सामान्य कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC-WHO) नुसार, भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची १.२३ लाख प्रकरणे आढळतात. यामध्ये सुमारे ६७ हजार महिलांचा मृत्यू होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.