सोशल मीडियावर रिक्वेस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल
फूड-अॅप स्विगीवरील एका कस्टरमने मुस्लिम डिलिव्हरी बॉय न पाठवण्याची मागणी केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या कस्टमरच्या विनंतीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या त्यावर गरमागरम चर्चा सुरू आहे.
हे प्रकरण 29 ऑगस्टचे आहे. हैदराबादच्या महादेवपुरी येथील एका कस्टमरने आपल्या घरापासून 3 किमी अंतरावरील एका दुकानावरून जेवण ऑर्डर केले. या ऑर्डरच्या स्पेशल इस्ट्रक्शनमध्ये या कस्टमरने लिहिले – Don’t want a Muslim delivery person. काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनीही या प्रकारावर तीव्र हरकत नोंदवली आहे.
गिग वर्कर्सच्या संघटनेचा विरोध
हा स्क्रीनशॉट गिग वर्कर्सच्या संघटनेचे प्रमुख शाइक सलाउद्दीन यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. त्यांनी स्विगीला खाण्यापिण्याच्या गोष्टीत धर्म मिसळणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले – आम्ही (डिलिव्हरी वर्कर) हिंदू, मुस्लिम, शिख आदी सर्वच धर्मांच्या नागरिकाना जेवण पोहोचवण्याचे काम करतो. त्यावर स्विगीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
कार्ति चिदंबरम यांनी नोंदवला विरोध
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार कार्तिक चिदंबरम यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. ते आपले ट्विट स्विगीला टॅग करताना म्हणाले – गिग वर्कर्सना धर्माच्या नावाने अशा प्रकारच्या कट्टरतेचा सामना करावा लागतो. प्लॅटफॉर्म कंपन्यांना हे दिसत नाही. या कंपन्या गिग वर्कर्सच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काय कारवाई करणार?.
यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
यावेळी प्रथमच ही घटना घडली नाही. फूड अॅपवर धार्मिक भावना दुखावण्याचे यापूर्वीही अनेक प्रकार घडलेत. यापूर्वी 2019 मध्ये एका ग्राहकाने झोमॅटोवर जेवण ऑर्डर केले. त्यानंतर जेवण घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला त्याचा धर्म विचारला. त्याने आपला धर्म मुस्लिम सांगितला असता त्याने ग्राहकाने ऑर्डर स्विकारण्यास नकार दिला.
कस्टमरच्या या व्यवहारानंतर झोमॅटोने त्याचे कोणतेही ऑर्डर घेण्यास नकार दिला. झोमॅटोच्या या भूमिकेचे त्यावेळी चांगलेच कौतुक झाले होते.