पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना सध्या चांगली मागणी आहे. आज हरतालिका असल्याने बाजारपेठेत महिलांची देखील गर्दी दिसत आहे. गणेश उत्सवाच्या निमित्याने सार्वजनिक गणेश मंडळात देखावे तयार केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे.
मुंबई, ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, बाप्पांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच बुधवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना (Ganpati Pratisthapna) होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. मुंबईमध्ये लालबाच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. नागपुरात चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी आज सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून येत आहे.
गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.
शुभ मुहूर्त
- गणेश चतुर्थी: बुधवार, 31 ऑगस्ट 2022
- गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 स्थापन करता येईल.
गणपती प्रतिष्ठापना विधी
- प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे.
- देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी.
- देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
- आसनावर बसावे.
- हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे.
- अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.
- उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.
- श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.
- नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे.
- गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे.
- गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे.
- ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे.
- गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात.
- गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.
- प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात.
- धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.
- नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.
- विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे.
- आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी.
- श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.