दुबई : हार्दिक पंडय़ाचे (तीन बळी आणि नाबाद ३३ धावा) अष्टपैलू योगदान, भुवनेश्वर कुमारचा (४/२६) भेदक मारा आणि रवींद्र जडेजाच्या (३५ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा विजयारंभ केला.
दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. नसीम शाहने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर केएल राहुलचा त्रिफळा उडवला. यानंतर विराट कोहली (३४ चेंडूंत ३५) आणि कर्णधार रोहित शर्मा (१८ चेंडूंत १२) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने कोहली आणि रोहित या दोघांनाही इफ्तिकार अहमदकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादवही (१८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परंतु जडेजा (२९ चेंडूंत ३५ धावा) आणि हार्दिक (१७ चेंडूंत नाबाद ३३) यांनी ५२ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर पाकिस्तानचा डाव १९.५ षटकांत १४७ धावांत आटोपला. भुवनेश्वरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (१०) झटपट माघारी पाठवले. तसेच फखर झमान (१०) आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान (४२ चेंडूंत ४३) आणि इफ्तिकार (२२ चेंडूंत २८) यांनी ४५ धावांची भागीदारी रचली. मात्र, हार्दिकने या दोघांसह खुशदिल शाहला (२) दोन षटकांच्या अंतराने बाद केले, तर भुवनेश्वरने शादाब खान (१०), आसिफ अली (९) आणि नसीम शाह (०) यांना माघारी धाडले. परंतु, शाहनवाज दहानी (६ चेंडूंत नाबाद १६) आणि हॅरिस रौफ (७ चेंडूंत नाबाद १३) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानला दीडशे धावांनजीक पोहोचता आले.
१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या. मग रोहित शर्मा बाद झाला, तेव्हा फलंदाजीला सुर्यकुमार यादव येणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानकडून लेग-स्पिनर शादाब खान व डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज चांगला मारा करत असल्याने भारताने डावखुऱ्या रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठविण्याचा धोका पत्करला आणि तो यशस्वी झाला. डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज आल्यावर गोलंदाजांची लय जाणार ही शक्यता गृहित धरण्यात आली आणि ती खरी ठरली. त्याचबरोबर धावफलक हलता ठेवण्याची जडेजाकडे क्षमता होती. ती त्याने सिद्ध करून दाखवली. त्याने २९ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.
जडेजा-हार्दिकची निर्णायक भागीदारी…
सहा चेंडूंच्या अंतराने रोहित शर्मा, विराट कोहली बाद झाले. त्यानंतर सुर्यकुमार यादवचीही एकाग्रता ढळली. भारताला ३४ चेंडूंत ५९ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्या खेळपट्टीवर उतरला. मोठ्या फटक्यांची घाई न करता जडेजा-हार्दिक जोडीने कमालीची संयमी भागीदारी केली. या जोडीने ५२ धावा केल्या. ही भागीदारी निश्चितच भारताचा विजय सुकर करणारी ठरली. हार्दिकने अष्टपैलू खेळ करताना तीन बळी घेतले आणि १७ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : १९.५ षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ४३, इफ्तिखार अहमद २८; भुवनेश्वर कुमार ४/२६, हार्दिक पंडय़ा ३/२५) पराभूत वि. भारत : १९.४ षटकांत ५ बाद १४८ (रवींद्र जडेजा ३५, हार्दिक पंडय़ा नाबाद ३३; नसीम शाह २/२७, मोहम्मद नवाज ३/३३)
प्रशिक्षक द्रविड करोनामुक्त ,लक्ष्मण माघारी
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करोनामुक्त झाला असून तो संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. त्याने रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकातील सामन्यात मैदानावर उपस्थित राहून भारतीय खेळाडूंना मार्गदर्शनही केले. द्रविडच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, द्रविड आता करोनातून सावरल्यामुळे लक्ष्मणला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.
अमित शहाचे सुपुत्र जयेश शहाचा तिरंगा हातात घेऊन फडकविण्यास नकार : सोशल मिडियसह चौफेर टिकास्र
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
भारताने सामना जिंकल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. जय शाह यांनीही आधी जल्लोष केला. त्यानंतर ते टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात तिरंगा देऊ केला. मात्र शाह यांनी ‘नो, नो’ म्हणत तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि ते टाळ्या वाजवत राहिले. हा सर्व घटनाक्रम मैदानातील कॅमेरांमध्ये कैद झाला आणि थेट प्रक्षेपणामध्येही दिसला. आता याच मुद्द्यावरुन तेलंगण राष्ट्र समितीचे सोशल मीडिया प्रमुख असणाऱ्या कृष्णन् यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करताना हे कृत्य भाजपा पक्षाशी संबंधित नसणाऱ्या नेत्याने केलं असतं तर काय झालं असतं अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.
“जर ही गोष्ट भाजपाशी संबंधित नसलेल्या नेत्याने केली असती, त्याने तिरंगा हातात धरण्यास नकार दिला असता तर संपूर्ण भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं. तसेच गोदी मिडीयाने दिवसभर यावर चर्चासत्र आयोजित केली असती. मात्र नशिबाने ही व्यक्ती शेहेनशाह यांचे पुत्र जय शाह आहेत,” असा खोचक टोला कृष्णन् यांनी ट्विटरवर जय शाह झेंडा पकडण्यास नकार देत असल्याच्या व्हिडीओची क्लिप पोस्ट करत लगावला आहे.