मुंबई : ”आला आला भक्तगणांचा चिंतामणी नाचत वाजत आला” ! तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे विघ्न टळल्याने आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शनिवारी मुंबईत भक्तांचा उदंड महापूरच आला. 103 वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळय़ासाठी लालबाग-परळ परिसरात हजारो भाविकांची गर्दी उसळली.
चिंतामणीचे मुखदर्शन घेण्यासाठी, त्याची एक छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी भाविकांची प्रचंड चढाओढ सुरू होती. अनेकांनी तर घराच्या छपरावर ठाण मांडून चिंतामणीचे दर्शन घेतले.
गणेशोत्सव बुधवारपासून सुरू होत असल्याने गणपतीच्या स्वागतासाठी भाविकांची प्रचंड लगबग सुरू आहे. शनिवारी सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक मंडळांचे बाप्पा त्यांच्या दरबारात डेरेदाखल झाले. आगमन मिरवणुकीत भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कुठे ढोल ताशांचा गजर, तर कुठे लेझीमचा ताल. कुठे डौलाने फडकणारे भगवे झेंडे, तर कुठे तल्लीन होऊन नाचणारे भाविक, असे उत्साही स्वरूप मुंबईभर दिसत होते.