(बातमीदाद : संतोष सकपाळ)
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या मोफत कॅरम स्पर्धेमध्ये युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसर शाळेचा वेदांत राणे विजेता ठरला. वेदांत राणेने आयझ्याक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईच्या श्रीशान पालवणकरचे अंतिम आव्हान १०-६ असे संपुष्टात आणून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे उपांत्य उपविजेतेपद मायकल हायस्कूल-कुर्ला शाळेच्या उझमा मलिक व शुभम परमार यांनी मिळविले. अविनाश स्पोर्ट्स, जयभवानी क्रीडा मंडळ-चिंचपोकळी व विश्वाचा राजा-दादर यांच्या सहकार्याने झालेल्या शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, रायगड जिल्ह्यातील ८४ शालेय खेळाडूंनी भाग घेतला.
वेदांत राणे वि. श्रीशान पालवणकर यामधील अंतिम फेरीच्या सामन्यात दोघांनीही सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखून प्रारंभी वर्चस्व राखले. डावाच्या मध्याला ६-२ अशी श्रीशान पालवणकरने आघाडी घेऊनही निर्णायक क्षणी वेदांत राणेच्या आक्रमक अचूक खेळापुढे १०-६ अशी हार पत्करली. उपांत्य फेरीच्या सामन्यात वेदांत राणेने उझमा मलिकचा २५-० असा तर श्रीशान पालवणकरने शुभम परमारचा २५-० असा पराभव करून अंतिम फेरीत आरामात प्रवेश केला. उपांत्यपूर्व उपविजेत्या त्रिशा गुप्ताचा विशेष गौरव करण्यात आला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कॅरमप्रेमी मंगेश चिंदरकर, अविनाश नलावडे, प्रणेश पवार आदी मंडळी उपस्थित होती.