युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झालेल्या शरद कोळी यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंची साथ सोडत चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं. त्या शिवसेनेच्या चाळीस आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शरद कोळी यांनी केलाय. शिवसेनेचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी नुकताच सांगोला दौरा केला. यावेळी त्यांनी शरद कोळी यांच्या निवडीची घोषणा केली होती. निवड झाल्यापासून शरद कोळी यांनी सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे कार्यक्रम घेत सभासद नोंदणी घेतली.
राज्यभर युवा सेनेचे कार्यालय स्थापन करून शिवसेना मजबूत करणार
शरद कोळी यांनी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे जंगी कार्यक्रम घेतले. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात युवासेनेचे कार्यालय स्थापन करून प्रत्येकाच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विचार पोहोचवीन, असा निर्धार कोळी यांनी केलाय. तसेच उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या प्रत्येक जिल्हाप्रमुखाला, शहरप्रमुखाला, महिला आघाडी प्रमुखाला सोबत घेऊन युवासेनेचा विस्तार करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शरद कोळी यांचं शहाजीबापू पाटलांना आव्हान
जिथे कमी तिथे आम्ही म्हणत सोलापूरच्या शरद कोळी यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. गद्दारांना गाडण्याची शपथही पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंसमोरच घेतली, पण सोलापूर जिल्ह्यात शरद कोळी यांच्या एंट्रीमुळे नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे. नदीकाठच्या मतदारसंघांमध्ये शरद कोळी यांचा संपर्क चांगला आहे आणि उद्धव ठाकरेंनाही याच मतदारसंघांमध्ये शिवसेनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यात शहाजी बापू पाटील हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्याची शपथच शरद कोळीने घेतलीय. शरद कोळी यांनी ताकद लावली तर मोहोळ आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला फायदा होईल, असं राजकीय जाणकार सांगतात.