ठाणे : भातसा नदीला पूर आल्यामुळे जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. तसेच इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती झाल्याने सदरची गळती काढणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवार दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९: ०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येत असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे अशी माहिती ठाणे महापालिकेने नागरिकांना दिली आहे.
या भागात पाणी पुरवठा बंद राहणार
बुधवार दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९ : ०० ते रात्री ९ : ०० वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इत्यादी भागांत पाणी पुरवठा बंद राहील तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
महापालिकेचे आवाहन
वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.