मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपावरुन चांगलीच जुंपली आहे. विरोधक अनेक मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशनादरम्यान आज सभागृहात मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र, या मुद्द्यावरुन बोलताना भाजपा नेते योगेश सागर यांची जीभ घसरली आणि त्यांनी वादग्रस्त विधान केले.
“मुंबईची अवस्था म्हणजे गरीब की जोरू, सबकी भाभी” असं वादग्रस्त वक्तव्य सागर यांनी केलं. योगेश सागर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या मुंबईच्या रस्त्यांवर किती एजन्सी काम करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई वाहनांची संख्या आणि रस्त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. डीपी रोड विकासकांच्या ताब्यात ठेवता कामा नये. हे महानगरपालिकेच नियोजित रस्ते आहेत. डीपी रस्त्यांच्या संदर्भात कमिटी नेमून त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय घ्यावा, अशी विनंती योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मुंबईतील सर्व रस्त्यांच काँक्रिटीकरण करणार
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याविषयी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून पुढील २ वर्षात मुंबईत खड्डे शोधूनदेखील सापडणार नाही. अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.