पक्षाविरोधी कारवायाचा ठपका
उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायांचा ठपका ठेवत यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपामध्ये उदय सामंत यांना उद्योग खाते मिळाले आहे. मात्र आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने शिंदे यांना पाठिंबा दिला होता. अपक्ष आणि शिवसेनेचे असे एकत्र मिळून जवळपास 50 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. आमदारांसोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी झाले होते. आता जे जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता उदय सामंत आणि यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.