नव्या वॉर्ड रचनेनुसार आता 236 वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक पार पडणार
- मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने 227 वॉर्डप्रमाणे निवडणुका घेण्याच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. मुंबईचे माजी उपमहापौर सुहास वाडकर यांनी या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर अखेर नव्या शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे.
2017 नंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यातच वॉर्डच्या झालेल्या पुर्नरचनेमुळे आणि नव्या आरक्षणामुळे बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसलाय. दरम्यान, नव्या वॉर्ड रचनेनुसार आता 236 वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक पार पडणार आहे. येत्या महिन्याभरात ही निवडणूक नेमकी कधी होणार, याबाबच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता शिवसेना मुंबई पालिका निवडणुकीच्या तयारीला आधीपासूनच लागली आहे. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलसह पालिकेवर एकहाती विजय मिळवण्याचासाठी प्रयत्न सुरु झालेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरीने भाजपचंही आव्हान शिवसेनेसमोर आहे. अशात आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे.