पेट्रोलचे दर दररोज काही प्रमाणात वाढतच आहेत. अशात रोजचा प्रवास करण्यासाठी उत्तम मायलेज असणारी बाईक असावी असा विचार प्रत्येकजण नक्की करत असेल. जर तुम्ही देखील असा विचार करत नवी बाईक घेण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही उत्तम मायलेज देणाऱ्या काही बाईक्स कमी दरात उपलब्ध आहेत. जर बाईक उत्तम मायलेज देत असेल तर त्यामुळे थोडाफार खर्च कमी होतो. यासाठी कमी दरातील उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक्स कोणत्या आहेत जाणून घ्या.
बजाज प्लॅटिना (Bajaj Platina)
बजाज ऑटोच्या अंतर्गत येणारी बजाज प्लॅटिना १०० ही बाईक उत्तम मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीसाठी ओळखली जाते. बजाज प्लॅटिना १०० ची एक्स-शोरूम किंमत ५३,००० रुपये आहे. या बाईकमध्ये १०२ सीसी चार स्ट्रोक, डीटीएस-आय, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ५.८ केडब्लूची कमाल पॉवर आणि ८.३ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये चार स्पीड गिअरबॉक्स आहेत. एक लिटर पेट्रोलवर ७० किमीपर्यंतची रेंज देण्याची क्षमता असणाऱ्या या बाईकमध्ये टॉप स्पीड ताशी ९० किमी आहे.
हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)
हिरो मोटोकॉर्प देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची हिरो एचएफ डिलक्स ही बाईक उत्कृष्ट मायलेजसाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच या बाईकची किंमतदेखील कमी आहे, ज्यामुळे ही बाईक दुचाकीस्वारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हिरो एचएफ डिलक्स बाईकची एक्स-शोरूम किंमत ५६,०७० ते ६३,७९० रुपये आहे. या बाईकमध्ये ९७.२ सीसी इंजिन आहे. हे इंजिन ५.९ केडब्लू पॉवर आणि ८.५ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर एका ग्राहकाने दिलेला रिव्यू देत कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की ही बाईक १०० किमी पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. पण बहुतांश मीडिया रिपोर्ट्समध्ये या बाईकचे मायलेज ८० ते ९० केएमपीएल नमूद करण्यात आले आहे.
टीवीएस स्पोर्ट (TVS Sport)
टीवीएस मोटर कंपनीची (TVS Motor Company) टीवीएस स्पोर्ट ही सर्वात लोकप्रिय बाईक आहे. ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. टीवीएस स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत ६० हजार ते ६६ हजार रुपयांपर्यंत आहे. या बाईकमध्ये १०९ सीसीचे इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन ८.१८ बीपीएचची पॉवर जनरेट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बाईकचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी आहे. टीव्हीएसच्या वेबसाईटवर नोंदवलेल्या काही रिव्ह्यूनुसार ही बाईक ११० किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. पण बहुतांश मीडिया रिपोर्ट्समध्ये या बाइकचे मायलेज ७० ते ९५ केएमपीएल नमूद करण्यात आले आहे.
बजाज सीटी ११० एक्स (Bajaj CT110X)
बजाज सीटी ११० एक्स ही बजाज ऑटोची आणखी एक लोकप्रिय बाईक आहे. यामागचे कारण म्हणजे उत्तम मायलेज आणि परवडणारी किंमत. बजाज सिटी ११० एक्स या बाईकची एक्स-शोरूम किंमत ६६ हजार रुपयांपासून सुरू होते. बजाज सीटी ११० एक्स बाईकमध्ये ११५.४५ सीसीचे चार स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.६ पीएसचे पॉवर आणि ९.८१ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकला चार-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. ही बाईक ७० केएमपीएल पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राइडिंग कंडिशननुसार ही बाईक ८५ केएमपीएल पर्यंत मायलेज देऊ शकते.