मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटमध्ये आपलं भविष्य आजमावत आहे. पण गेल्या काही काळापासून त्याला अपेक्षित अशी संधी मिळत नसल्याने त्याचा खेळ बहरत नसल्याचे बोलले जात आहे. आता यामुळेच अर्जुन तेंडुलकर याने मोठे पाऊल उचलले आहे. अर्जुनने आता मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्याला मान्यता देखील देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अर्जुन मुंबई संघाकडून खेळताना दिसणार नाही.
मुंबईचा संघ सोडून गोवा क्रिकेट असोसिएशन कडून खेळण्यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशन कडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनने अर्जुनला ना हरकत प्रमाणपत्र देत गोवा संघातून खेळण्याला परवानगी दिली आहे. गेल्या हंगामात अर्जुन तेंडुलकर हा मुंबई रणजी संघाचा काही काळ सदस्य होता. मात्र तेव्हा त्याला एकाही सामन्यात संघाचे प्रतिनिधीत्व करता आले नव्हते. 2020-2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी अर्जुन हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध मुंबईकडून केवळ दोन सामने खेळला होता.
आगामी काळात देशांतर्गत फर्स्ट क्लास क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळेच अर्जुन संधीच्या शोधात आहे. करिअरच्या या टप्प्यावर जास्तीत जास्त वेळ मैदानावर खेळण्यात घालवणे हे अर्जुनसाठी सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे दुस-या संघाकडून खेळल्यामुळे अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळता येतील, असा विश्वास एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात व्यक्त केला आहे.
गोव्याकडून संधी?
अर्जुन हा डावखुरा गोलंदाज आहे. गोवा संघाला सध्या वेगवान डावखु-या गोलंदाजाची गरज असल्याने गोवा क्रिकेट असोसिएशनने अर्जुनला आपल्या संघात आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी खेळवण्यात येणा-या मर्यादित षटकांच्या सराव सामन्यात अर्जुन गोव्याकडून खेळणार आहे. या सामन्यांतील त्याच्या कामगिरीवरुन निवड समिती त्याला संघात ठेवण्याबाबत निर्णय घेईल असे गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी म्हटले आहे.