-
मुंबई: अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची शाळाच घेतली. उद्धव ठाकरे सभागृहात नाहीयेत मात्र त्यांचं काम आज अजितदादांनी केलं. बंडखोर आमदारांना नियम शिकवित जागच्या जागी गप्पगार केलं. यावेळी अजितदादांच्या निशाण्यावर नवनिर्वाचित मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत होते.
राज्य विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशीची सकाळही विरोधकांनी गाजवली. काल “५० खोके सगळं ओक्के” अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. आज एक पाऊल पुढे टाकत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपलं नवं ‘घोषणास्त्र’ बाहेर काढलं. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी, अशी नवी घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना हिणवलं.
नवीन सरकारला सत्तेवर येऊन अगदीच थोडे दिवस झाल्याने तसेच मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडल्याने विरोधकांच्या संबंधित विषयानुरुप प्रश्नाला उत्तरे देताना मंत्री महोदयांची तारांबळ उडाली तसेच भाषणादरम्यान अडथळे आणणाऱ्या नेत्यांना अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये गप्पगार केलं.
पहिला नंबर होता, तानाजी सावंत : अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र यानंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न विचारला. मात्र उत्तर माहिती नसल्याने तानाजी सावंत शांत बसले. अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तेव्हा त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुसरा नंबर होता शंभूराज देसाई : शेतकरी प्रश्नावरुन तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार विधिमंडळ सभागृहाचं लक्ष ओल्या दुष्काळाकडे वेधू पाहत होते. अजित पवार बोलत असतानाच, “दादा यावेळी राज्यात पाऊस चांगला झालाय”, असं बसल्याजागी शंभूराज म्हणाले. त्यावर मात्र अजितदादांचा पारा चढला. शंभुराज मध्ये बोलायचं नाही हा…. आपण एकत्र काम केलंय, मध्ये बोलायचं नाही हे माहिती नाही का… असं म्हणत दादांनी मंत्री देसाई यांची शाळा घेतली. सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय आणि पाऊस जास्त झाला काय म्हणता?, असा उलट सवालही त्यांनी केला.
तिसरा नंबर होता अब्दुल सत्तार : मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशीच अब्दुल सत्तार यांचं टीईटी घोटाळा प्रकरण समोर आल्याने सत्तारांचं मंत्रिपद नक्की हुकणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून शिक्षण विभागाच्या संचालकांचं क्लीनचिट प्रमाणपत्र दाखवून अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळातील आपली जागा फिक्स करुन घेतली. त्यानंतर खातेवाटपातही सत्तारांनी आघाडी मारलीय. कृषीखात्यासारखं महत्त्वाचं खातं सत्तारांना मिळालं. सगळ्यांनाच जसा हा धक्का होता, तो अजित पवार यांना देखील होता.
अब्दुल सत्तार तुम्ही कृषी मंत्री झालात, मी तर आश्चर्यचकीतच झालो बाबा…, असा टोला त्यांनी सत्तारांना लगावतानाच दादा भुसेंवर का अन्याय झाला समजलं नाही, असं सांगत भुसेंच्या जखमेवरची खपली काढली.