श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ आढळल्या असून काही कागदपत्रेही आढळली आहेत. तसेच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथील समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या असून यात हत्यारं आणि कागदपत्रे आढळली आहे. या बोटींमध्ये तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच २०० ते २२५ जिवंत काडतूस असल्याचीही माहिती आहे.
या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”आज सकाळी संशयास्पद बोट सापडली असून या बोटीत तीन एके ४७ कागदपत्रे आणि २०० ते २२५ जिवंत काडतुसे सापडली असल्याची माहिती आहे. ही घटना अतिशय गंभीर असून सरकारने याची चौकशी करावी”, असे ते म्हणाले. तर आदिती तटकरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”राजयगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयित बोट आढळून आली असून यात काही हत्यारं सापडली आहे. यासंदर्भात तत्काळ एक चौकशी समिती नेमून याची चौकशी करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.