नवी दिल्ली: शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? या दोन प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन महिने पूर्ण होऊनही आणखी मिळालेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी विविध याचिका दाखल केल्या आहेत. मुंबई महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीअगोदर चिन्हाला प्रश्न निकाली लागावा, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला ) पत्र लिहिलं होतं. यानंतर न्यायालयाच्या दारी फैसला होण्याअगोदर निवडणूक आयोग चिन्हाचा निकाल लावेल, अशी भीती मनात असल्याने उद्धव ठाकरे गटाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार आज झालेल्या सुनावणावेळी निवडणूक आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदवणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा दिलासा मानण्यात येतोय. याआधीच्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण तातडीने सुनावणीसाठी मांडण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न होतोय. पण न्यायालयाने या ना त्या कारणाने तीन वेळा सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. प्रकरण घटनात्मक पीठाकडे द्यायचं की नाही या निर्णयासाठी सुनावणी लांबणीवर टाकत असल्याचा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला आहे. दुसरीकडे अशावेळी पक्ष चिन्हाबाबत समोरील गटाकडून निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं गेलंय, तसेच याचिकाही दाखल केली असल्याचं आणि निवडणूक आयोगाने तारीख दिल्याचंही ठाकरे गटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. आज याचविषयी झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदवणार आहे. १९ तारखेला सरन्यायाधीश रमणा चिन्हाविषयी निरीक्षण नोंदवतील. सरन्यायाधीश रमणा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वीच दोन्ही गटाच्या याचिकांचा निकाल लागणार की त्या घटनापीठाकडे सोपवल्या जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात चार वेगवेगळ्या विषयांवर याचिका दाखल आहेत. या याचिकांवर पुढील सुनावणी २२ तारखेला पार पडणार आहे. पण तत्पूर्वी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग शिवसेनेचं पक्ष चिन्ह धनुष्यबाणाबाबत निर्णय देऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे गटाने याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाआधी सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या पक्षचिन्हावर निरीक्षण नोंदवणार असल्याने उद्धन ठाकरेंसाठी हा दिलासा मानण्यात येतोय. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. ते आम्हाला न्याय देतील, अशी आशा उद्धव ठाकरे वारंवार बोलून दाखवत आहेत. मातोश्रीवर येणाऱ्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा संदर्भ देत आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा? असा प्रश्न उभा ठाकलेला असताना पुढच्या तीन दिवसांनी होणारी सुनावणीने राज्याच्या राजकारणाची दिशा पलटू शकते, असा शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत.