मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्य रेल्वे मार्गावर १० नव्या एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसी लोकलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला असून, आता सीएसएमटी स्थानकापासून ते बदलापूर स्थानकापर्यंत एसी लोकल चालवल्या जातील. एसी लोकलचे तिकीट दर कमी केल्यापासून प्रवाशांची एसी लोकलला पसंती मिळत आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे महाप्रबंधक अनिक कुमार लाहोटी यांनी दिली.
नव्या एसी लोकल फेऱ्यांची माहिती…
- सीएसएमटी ते बदलापूर – ४ एसी फेऱ्या
- ठाणे-सीएसएमटी – ४ एसी फेऱ्या
- कल्याण – सीएसएमटी – २ एसी फेऱ्या
या निर्णयामुळे प्रवासांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल सुरू करण्यात आली होती. अलिकडेच एसी लोकलचे भाडे कमी करण्यात आले आहे. यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
एसी लोकलच्या ६६ फेऱ्या
सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या ५६ फेऱ्या होतात. यात लवकरच आणखी दहा वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची भर पडेल. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या ५६ वरून ६६ होणार आहेत.