चाळीसगाव : वन विभागाच्या क्षेत्रात मेंढ्यांना चराईसाठी बंदी असताना, जुनपाणी व घोडेगाव नियतक्षेत्रात सर्रास मेंढ्या चराईला सोडले असल्याची गुप्त माहिती व अधिकारी यांना मिळाली. त्यावर सदर ठिकाणी छापा टाकून पन्नास हजारांचा दंड मेंढपाळकडून वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मेंढपाळ हे चांगले धास्तावले आहेत.
सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे सर्व परिसर हे हिरवेगार असून या क्षेत्रात मेंढ्यांना चराईसाठी बंदी आहे. असे असताना सुद्धा याठिकाणी मेंढ्यांना चरण्यासाठी सोडले जाते. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी एक टीम बनवून त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी १०० मेंढ्या मिळाल्या.
वनविभाग अधिकारी यांनी प्रती मेंढी ५०० रु प्रमाणे १०० मेंढ्यांची ५० हजार रु दंड वसूल केला. सविस्तर माहिती अशी कि, चाळीसगाव वनक्षेत्रातील नियतक्षेत्र कक्ष क्र. २९० (जूनपाणी), व कक्ष क्र. २९६ (घोडेगाव) मध्ये वनविभागाची जमीन आहे. कक्ष क्र. २९० (जूनपाणी), व कक्ष क्र. २९६ (घोडेगाव) मध्ये सर्रास मेंढ्या चराईला सोडले जातात. त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या मेंढपाळाचे नाव रामदास बाळू आगुणे रा. घोडेगाव, परशुराम सीताराम रावते रा. घोडेगाव ता. चाळीसगाव असे संशयित आरोपीतांचे नावे आहे.
आरोपींसह मेंढ्यांना मौजे राजदेहरे येथे आणून उभा कोंडवाडा करण्यात आला असून भारतीय वन अधिनिय १९२७ चे कलम- २६ (१)अ, फ, ड अशा विविध कलमानुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे वनविभागाच्या हद्दीत अनाधिकृत मेंढी चारणाऱ्या मेंढपाळ चांगलेच धास्तावले आहे.