मुंबई : देशाभिमानाला सर्वाधिक महत्व देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सोमवारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवदिन कॉलेज विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करून स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देणार आहे, अशी माहिती सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्या निमित्त “जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ” या मान्यताप्राप्त कॅटरिंग कॉलेज विद्यार्थ्यांची सोमवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सकाळी ८वाजता परेल येथील संघटना कार्यालयातून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.हाती तिरंगा ध्वज फडकावीत, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चिरायू ठरो !तसेच बल सागर भारत होवो!गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!या सानेगुरुजी,कुसुमाग्रजांच्या अजरामर काव्यपंक्तीचा फलक हाती घेऊन, मोठ्या संख्येने कॉलेज विद्यार्थी क्रांतीचा जागर करीत प्रभात फेरीत सामील होतील.या प्रभात फेरीत संघाचे सेवादल विभागही सहभागी होईल.
विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गं.द.आंबेकर मार्ग,भोईवाडा-टाटा हॉस्पिटल,परळ गावातून मिल मजदूर संघ कार्यालयात विसर्जित होईल.तेथे सर्व विद्यार्थी सामुदायिक ध्वजारोहण समारंभात सहभागी होतील. ध्वजारोहण अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते पार पडेल.
स्वातंत्र्य,लोकशाही आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करा! भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू ठरो!संविधानाचा मान राखा आणि लोकशाही भक्कम करा! अशाही घोषणा कॉलेज विद्यार्थी प्रभात फेरीत देतील.
ब्रिटिशांनी या देशातून चालते व्हावे, यासाठी महात्मा गांधींजीनी अहिंसक मार्गाने ‘स्वदेशी चळवळ’ ‘सत्याग्रहा’सारखे लढ्याचे मार्ग अनुसरले होते.त्या पैकीच “प्रभात फेरी”हा देखील स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रभावी मार्ग ठरला या आठवणीना प्रभात फेरीने उजाळा देण्यात येणार आहे.
संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच कॉलेजचे विलास डांगे, संघटनेचा, कॉलेजचा सेवकवर्ग, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी हा सोहळा यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या औचित्याने जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रीयत्व जोपासण्याचे आवाहन अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी केले आहे.*(