मुंबई : दशतवाद्यांच्या लक्ष्यावर असलेल्या मुंबईतील रेल्वे स्थानकावरील घातपात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे पोलीस फलाटावरील बूट पॉलिशवाले, रेल्वे कँटीन कर्मचारी आणि रेल्वे हमालांची मदत घेणार आहेत. त्यांना रेल्वे पोलिसांकडून खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील सर्वात गर्दीचे ठिकाण आणि उपनगरीय रेल्वे स्थानके ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. दररोज लाखोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकावर घातपात कारवाई तसेच इतर गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांनी कडक पाऊले उचलत रेल्वे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
यंदा भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे, या स्वातंत्र्य दिनी कुठलाही अनुचित प्रकार अथवा घातपात घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानके तसेच आजूबाजूच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.
त्याचबरोबर घातपात रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावरील बूट पॉलिशवाले, कँटीन कर्मचारी, रेल्वेतील हमाल आणि फेरीवाले यांची मदत घेतली जाणार आहे, गुन्हेगारी तसेच संशयित हालचाली आढळून आल्यास त्वरित रेल्वे पोलिसांना कळविण्यात यावे अशा सूचना रेल्वे पोलिसांकडून त्यांना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगार आणि संशयित इसमांना कसे ओळखाल, त्यांना कसे रोखता येईल हे प्रशिक्षण रेल्वे पोलिसांकडून बूट पॉलिशवाले, फेरीवाले, हमाल आणि रेल्वेतील फेरीवाले यांना दिले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.