एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे ९ तसेच भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा विकासक मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रीपद मिळताच लोढा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१० ऑगस्ट) सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही.
सध्या शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारही लवकरच होईल, असे म्हटले जात आहे. दुसऱ्या टप्प्प्यात अपक्ष तसेच नाराज नेत्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. या टप्प्यात महिला नेत्यांनादेखील मंत्रिपद दिले जाऊ शकते. दरम्यान, सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे पक्षाला सत्तेत वाटा मिळणार का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.