मुंबई : मुंबईचा पुढचा महापौर हा निश्चितपणे शिवसेना-भाजपा युतीचाच होईल. याबाबत दोन्ही पक्षांच्या भूमिका स्पष्ट आहेत. आमच्यासाठी विचारधारा महत्त्वाची असून, मुंबई-महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांच्या विचाराला चालना देण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. त्यापुढे महापौर पद गौण आहे, असे मत शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.
‘हर घर तिरंगा’ अभियानानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला ध्वज प्रदान करण्यासाठी आले असता खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. शेवाळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले, त्याग केला. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, असा हेतू या उपक्रमामागे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही स्वातंत्र्य संग्रामातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्मारकाला भेट दिली, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक मंत्री बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित
मंत्रिपदाची शपथ घेताना शिवसेनेच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्याबाबत विचारले असता शेवाळे यांनी सांगितले की, मूळ शिवसेना म्हणून आमची विचारधाराच ‘बाळासाहेब’ आहेत. आम्ही त्यांचे नाव घेऊन पुढे जात आहोत. आमच्या मंत्र्यांनी शपथ घेताना बाळासाहेबांचा उल्लेख केला नसला, तरी प्रत्येकाला पदोपदी बाळासाहेबांची आठवण येत असते, असेही शेवाळे म्हणाले.
आमदारांत नाराजी नाही
आमची भाजपासोबत झालेली युती हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी आहे; मंत्रिपदासाठी नाही. त्यामुळे मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज आहेत, अशा चर्चा आमच्यासाठी गौण आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मुंबईकर चेहरा नाही, याबाबत विचारले असता शेवाळे म्हणाले, केवळ मुंबई नव्हे मराठी माणूस आमच्या मंत्रिमंडळात केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याचे दायित्त्व आहे की, मुंबईच्या विकासात योगदान द्यावे. मंगलप्रभात लोढा मुंबईकर चेहरा आहेत, ते अखंड महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. त्यामुळे मंत्रिमंडळात मुंबईकर चेहरा नाही, याचे राजकीय भांडवल करून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी असल्याचे जे भासवत आहेत, त्यांना जनताच येत्या काळात उत्तर देईल.