मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील पक्षवर्चस्वाची लढाई सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रदेखील दिले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही ठाकरे-शिंदे गटातील वादाशी निगडित अशा एकूण पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची आठवण करून देण्यता आली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणखी ४ आठवड्यांची मुदत मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयात १२ ऑगस्ट रोजी सुनावणी
शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही.एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखीलील तीन सदस्यीय पीठासमोर येत्या १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे का यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांना समर्थनाचे शपथपत्र देण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच ठाकरे गटाकडून अन्य कागदपत्रेही जमा केली जात आहेत. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण घटनापीठाकाडे जाणार का तसेच निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.