मुंबई : पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजापासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राऊत न्यायालयीन कोठडीमध्ये असताना न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना एकीकडे दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
सोमवारी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. पत्राचळ पुनर्विकासातील पैशांच्या अनियमिततेप्रकरणी ते ईडीच्या कोठडीत असून आज त्यांचा ईडी कोठडीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांना आज पुन्हा न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यानंतर साऱ्यांचे लक्ष संजय राऊतांना ईडी कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे होते. गेल्या दोन सुनावणीत संजय राऊत यांना न्यायाधीश देशपांडे याांनी ईडीच्या कोठडीत पाठवले होते. त्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राऊतांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर ३१ जुलै रोजी अटक झाली होती. त्यानंतर राऊतांना दोन वेळा ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले असून त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.