गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोकणवासियांना चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे मुसळधार पावसाने कोकण हैराण झाले आहे. या मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला देखील फटका बसला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाल्याचे सांगितले जात आहे. यासह मुसळधार पावसाने कोकणातील नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ पाणी वाढले आहे, यामुळे रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना आणि घरांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी अजंनारी पुलावरची वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.
पावसाळी वातावरणामुळे दरड हटवण्यास अडथळा
रत्नागिरी जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळी संपलेल्या २५ तासांत सरासरी १८२ मिलिमीटर, तर सर्वाधिक २९० मिलिमीटर लांजा तालुक्यात नोंदविला गेला. राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि खेड हे चार तालुके वगळता इतर सर्व पाचही तालुक्यांमध्ये २०० पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद २४ तासांत झाली आहे. राजापूर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवाहर चौक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आहे. मंडणगड तालुक्यात बाणकोट पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत चिंचघर ते मांदिवली जोडणाऱ्या भारजा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. खेड तालुक्यातील जगबुडी आणि लांजा तालुक्यातील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शास्त्री तसेच कोदवली आणि बावनदी इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. खेड तालुक्यात रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पावसाळी वातावरणामुळे दरड हटवण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.