NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA SAKPAL
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेने विजेतेपद पटकाविले. दडपण न घेता अचूक सोंगट्या टिपणाऱ्या उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसाद मानेने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळेचा सहाव्या निर्णायक सामन्यात १२-४ असा चुरशीचा पराभव केला आणि प्रसादने अजिंक्यपदाला गवसणी घातली. सुरुवातीचे बोर्ड हातचे निसटल्यामुळे प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व सुरेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने तृतीय तर पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. पंचाचे कामकाज क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, ओमकार चव्हाण आदींनी केले. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने संपन्न झालेला कॅरमचा शालेय उपक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपाचा होता. खेळाडूंच्या पालकवर्गाने सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने स्तुती केली.
******************************************************************