NHI NEWS AGENCY/REPORTER/ SANTOSH SAKPAL
मुंबई;-श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूल, बालमोहन विद्या मंदिर, उत्कर्ष मंदिर तर मुलींमध्ये बालमोहन विद्या मंदिर, एसआयईएस, चुनाभट्टी हायस्कूल आदी शालेय संघांनी सलामीचे सामने जिंकले. दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवम साळुंखेच्या आक्रमक चढाया व सुजल कदमच्या बहारदार पकडीच्या खेळामुळे महाराष्ट्र हायस्कूलने सरस्वती हायस्कूल विरुध्द पहिल्या डावात १६ गुणांची आघाडी घेत अखेर सलामीची लढत ४७-२७ अशी जिंकली. सरस्वती हायस्कूलचा चढाईपटू विघ्नेश मोरेची झुंज एकाकी ठरली. स्पर्धेचे शानदार उद्घाटन समितीचे अध्यक्ष प्रकाश परब, कार्यवाह डॉ. अरुण भुरे, अविनाश नाईक, मधुकर प्रभू, डॉ. यशस भुरे, डॉ. विजय शुंगारपुरे, अजित पिम्पूटकर, संजय आईर आदी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मुलांच्या गटात बालमोहन विद्या मंदिरचा कप्तान साई साटमच्या आक्रमक चढाया रोखण्यात चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूल संघाच्या बचावपटूंना अपयश लाभले. परिणामी बालमोहन विद्या मंदिरने ४४-१४ असा मोठा विजय मिळविला. उत्कर्ष मंदिरने पुनीत गुप्ता व स्वरूप कडंनच्या चौफेर खेळामुळे सनराईज इंग्लिश स्कूलचा ३०-१० असा तर एमपीएस वुलन मिल स्कूलने अमोघ परबच्या दमदार चढायांमुळे एमपीएस राजवाडी स्कूलचा ३६-३० असा पराभव करून पहिली फेरी जिंकली.
मुलींच्या गटात गतविजेत्या एसआयईएस हायस्कूलने सांघिक खेळाच्या बळावर विनय हायस्कूलचे आव्हान ५०-१५ असे सहज संपुष्टात आणून प्रारंभ जोरदार मुसंडीने केला. बालमोहन विद्या मंदिर विरुध्द जवाहर विद्यालय यामधील लढत संपूर्ण डावात झटापटीच्या खेळासह चुरशीची झाली. श्रेया मोरेच्या चढाया व सानिया पाटीलच्या पकडीच्या खेळामुळे बालमोहन शाळेने ६०-४३ असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. चुनाभट्टी हायस्कूलने जनता हायस्कूलचा ३६-२८ असा अटीतटीचा पराभव करताना विजयी संघाची अर्चना राजक चमकली.
******************************