NHI NEWS AGENCY/
REPORTER/ANAGHA SAKPAL
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये सलामीच्या साखळी सामन्यांपासूनच चुरस निर्माण होणार आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेला पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्न गोळे विरुध्द पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरचा वेदांत राणे विरुध्द पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा प्रसाद माने तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी विरुध्द पाटकर विद्यालय-डोंबिवलीची केतकी मुंडले यामधील प्रारंभीच्या साखळी लढती प्रेक्षणीय ठरण्याच्या शक्यता आहेत.
सुपर लीग कॅरम स्पर्धेसाठी शालेय १२ सबज्युनियर कॅरमपटूची नुकत्याच झालेल्या शालेय पात्रता कॅरम स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे. पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे विरुध्द डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, नारायण गुरु स्कूल-चेंबूरचा उमैर पठाण विरुध्द पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत विरुध्द देविका जोशी यामधील उर्वरित साखळी लढती देखील चुरशीच्या होतील. राज्य क्रीडा दिनानिमित्तच्या स्पर्धेमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, अविनाश स्पोर्ट्सचे प्रमुख अविनाश नलावडे आदींचे सहकार्य लाभले आहे.