NHI NEWS AGENCY/REPORTER ANAGHA SAKPAL
मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग कॅरम स्पर्धेसाठी शालेय १२ सबज्युनियर कॅरमपटूची निवड करण्यात आली आहे. वर्षअखेरीस ६२ स्पर्धकांच्या सहभागाने झालेल्या १५ वर्षाखालील कॅरम स्पर्धेतून पहिल्या आठ खेळाडूंना थेट प्रवेश तर उर्वरित ४ खेळाडू उपउपांत्यपूर्व फेरीमधून निवडण्यात आल्याचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर यांनी जाहीर केले आहे. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणारा हा कॅरमचा शालेय उपक्रम विनाशुल्क स्वरूपाचा आहे.
आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील चँम्पियन ठरण्यासाठी पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा प्रसन्न गोळे, युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरचा वेदांत राणे, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूल- चेंबूरचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने, निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले व नील म्हात्रे यांच्यामध्ये दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये चुरशीच्या साखळी लढती होतील. विजेत्या-उपविजेत्या ८ खेळाडूंना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, अविनाश स्पोर्ट्सचे प्रमुख अविनाश नलावडे आदींचे सहकार्य लाभले आहे.
*****************************************************