भारताने विजयासाठी दिलेले १८९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विडींजची सरुवात वाईट झाली. अक्षर पटेलने झटपट त्यांचे पहिले तीन गडी बाद केले. पाचव्या षटकाच्या अखेरीस ३३ धावांत तीन गडी बाद झाले होते. शिमरॉन हेटमायरने ३५ चेंडूत ५६ धावा करून कसाबसा डाव सावरला.
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (७ ऑगस्ट) फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथे झाला. भारताने या सामन्यात वेस्ट इंडीजचा ८८ धावांनी पराभव करून ४-१ अशा फरकाने मालिका आपल्या खिश्यात घातली. आगामी टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची समजली जात होती.
विंडीजच्या शेवटच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. याला भारतीय फिरकीपटू जबाबदार होते. रवी बिश्नोईने चार, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. म्हणजे या सामन्यातील सर्व दहा गडी फिरकीपटूंनी बाद केले.
त्यापूर्वी, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवात संथ झाली होती. ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर त्याचा सलामीचा साथीदार श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ४० चेंडूत ६४ धावा फटकावल्या. दीपक हुड्डाने ३८ धावा करून श्रेयसला साथ दिली. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर भारताचे ठराविक अंतराने गडी बाद झाले. त्यामुळे भारतला २० षटकांमध्ये सात गड्यांच्या बदल्यात १८८ धावा करता आल्या.