भारताचा दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने देशासाठी आणखी एक सुवर्णपदक कमावले आहे. अनुभवी स्टार शरथने युवा खेळाडू श्रीजा अकुलासह मित्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. ( CWG 2022 Table Tennis) काॅमनवेल्थ गेम्स 2022 च्या नवव्या दिवशी 40 वर्षीय शरथ आणि 24 वर्षीय श्रीजा या खास भारतीय जोडीने रविवारी 7 ऑगस्टला रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत मलेशियाचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
टेबल टेनिसमध्ये भारताचे दुसरे सुवर्ण
पाचव्या CWG मध्ये प्रथमच खेळांचा भाग बनलेल्या अचंता आणि श्रीजा यांनी मलेशियाच्या जावेन चुंग आणि कॅरेन लेन यांचा 11-4, 9/11,11-5, 11-6 असा पराभव केला. यापूर्वी शरथने जी साथियान, हरमीत देसाई आणि सनील शेट्टी यांच्यासह पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. 2006 च्या मेलबर्न गेम्समध्ये पदार्पण करणा-या शरथने त्याचे सहावे CWG सुवर्णपदक आणि एकूण 12 वे सुवर्णपदक जिंकले. आता त्याला आणखी एक सुवर्ण संधी आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत
भारताचा सर्वात यशस्वी पुरुष टीटी खेळाडू शरथ आता सोमवारी 8 ऑगस्ट रोजी खेळांच्या शेवटच्या दिवशी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. 2006 मध्ये त्याच्या पहिल्याच गेममध्ये शरथने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर, तो प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.