NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA SAKPAL
मुंबई: जे.जे.रुग्णालय क्रिकेट संघाचे सलामीवीर चंद्रकांत नाईक यांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे जे.जे. हॉस्पिटलमधील सहकारी डॉक्टर, स्टाफ तसेच क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण निरोप दिला. जे.जे. हॉस्पिटल प्रशासकीय भवन सभागृहामधील सोहळ्यात प्रमुख पाहुण्या डॉ. शुभांगी दळवी यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रकांत नाईक यांच्या ३५ वर्षे जे.जे. हॉस्पिटल सेवा काळाबद्दल प्रशंसोद्गार काढले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी यष्टीरक्षक व सलामीवीर चंद्रकांत नाईक यांच्या जे.जे. रुग्णालयीन संघामधील कामगिरीसह क्रिकेट विश्वातील योगदानाची मुक्त कंठाने स्तुती करीत आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत शाल श्रीफळ व सन्मानचिन्हाद्वारे त्यांच्या कारकीर्दीचा सपत्नीक गौरव केला.
निरोप सोहळ्यात जे.जे. स्टाफ सहकाऱ्यांनी चंद्रकांत नाईक यांच्या साडेतीन दशकातील सेवेमधील वक्तशीरपणा व हसतखेळत दिलेल्या प्रामाणिक रुग्ण सेवेचा विशेष उल्लेख केला. सर जे. जे. हॉस्पिटल सेवेत सन १९८९ मध्ये रुजू झालेल्या चंद्रकांत नाईक यांनी सर जे.जे. रुग्णालयीन क्रिकेट संघात सलामीचा फलंदाज व यष्टीरक्षक असा नावारुपाचा खेळ केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जे.जे. हॉस्पिटल क्रिकेट संघाने रुग्णालयीन क्रिकेट क्षेत्रातील प्रतिष्ठेची गिरनार क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. गिरनार क्रिकेट स्पर्धेमध्ये तीन शतके ठोकणाऱ्या सलामीवीर चंद्रकांत नाईक यांनी २५ वर्षाहून अधिक काळात टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा, गिरनार क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्र शासनाची थळे शिल्ड क्रिकेट स्पर्धा, कांगा लीग क्रिकेट स्पर्धा, आयडियल रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धा गाजविताना वैयक्तिक पुरस्कारांची देखील लयलूट केली. दाजी या टोपण नावाने टेनिस क्रिकेट विश्वात धडाकेबाज फलंदाजीसाठी ते सुपरिचित होते. समारंभप्रसंगी डॉ.राजश्री बोगडे, सौ. कल्पना नाईक, क्रिकेटपटू सुनील व्हिलीयम, मयुरेश नाईक, योजना नाईक, सागर मोरे आदी उपस्थित होते. तसेच क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप मसुरकर, भरत पेडणेकर, अनिल शेलार, निलेश पारकर, नरेश शिवतरकर, गुरुनाथ हळदणकर, संजय पाटील, सुभाष शिवगण आदी क्रिकेटपटू उपस्थित होते.
******************************