राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकामागून एक सुवर्ण पदक मिळत आहे, भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत न्यूझीलंडवर पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळवून कांस्यपदक जिंकले. निर्धारीत वेळेत शेवटच्या १८ सेकंदात भारताने न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक दिल्याने १-१ अशी बरोबरी झाली. पण, पेनल्टी शूटआऊटमध्ये सविताने अप्रतिम बचाव केला. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.
नितूने तिच्या कर्तृत्वाने या सर्वांचा त्याग सार्थ ठरवला
हरयाणाच्या या २२ वर्षीय बॉक्सिंगपटूने अल्पावधीतच या खेळात आपला ठसा उमटवला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नितूला बॉक्सर बनवण्याचे सर्व श्रेय तिच्या वडिलांचे आहे. संपूर्ण कुटुंब जेव्हा नितूच्या बॉक्सर बनण्याच्या विरोधात होते, तेव्हा ते तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. चंडीगढ विधानसभेचे कर्मचारी असलेल्या त्यांनी नितूला बॉक्सर बनवण्यासाठी तीन वर्ष रजा घेतली. या काळात त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु नितूने तिच्या कर्तृत्वाने या सर्वांचा त्याग सार्थ ठरवला. २०१६मध्ये तिने युवा राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर २०१७मध्ये बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०१८मध्ये तिने चार सुवर्णपदके जिंकली. त्यात आशियाई युवा अजिंक्यपद, युवा राष्ट्रीय स्पर्धा. गोल्डन ग्लोव्ह्ज स्पर्धा व युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश होता. २०२२मध्ये तिने बल्गेरियातील स्पर्धा जिंकली.
पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश
बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चत केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-१९, २१-१७ असा पराभव केला. सिंधूला २०१९च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीच्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, परंतु यंदा त्याचे रुपांतर सुवर्णपदकात करण्याचा तिचा निर्धार आहे. २०१८मध्ये सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले होते, तर २०२२मध्ये याच गटात रौप्यपदकही नावावर आहे. २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदकाची तिने कमाई केली होती.