NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA
मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत अर्णव गावडे, पृथ्वी बडेकर, श्रीशान पालवणकर, उमैर पठाण, रेहान शेख आदींनी सलामीचे सामने जिंकले. उद्घाटनीय सामन्यात आर्यन गावडेने अचूक फटक्यांची आतषबाजी करीत प्रियांषु सिंगचे आव्हान १३-० असे संपुष्टात आणले. स्पर्धेचे उद्घाटन एमजेएससीचे उपाध्यक्ष विकास खानोलकर, सेक्रेटरी सुनील पाटील, खजिनदार महेश शेट्ये, माजी क्रिकेटपटू सुरेंद्र बाबरेकर, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर व ओमकार चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल पव्हेलीयनमधील स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शालेय ३२ खेळाडू दर्जेदार खेळाची झलक दाखवीत आहेत. अचूक सोंगट्या घेणाऱ्या बलाढ्य श्रीशान पालवणकरविरुध्द खेळतांना प्रारंभीचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे बालाजी कथुरोजीगरीचे दडपण वाढले. परिणामी श्रीशान पालवणकरने सलामीचा सामना १९-६ असा जिंकून दुसरी फेरी गाठली. डावाच्या मध्यापर्यंत चुरशीची लढत देणाऱ्या शुभम परमारला पृथ्वी बडेकरने निर्णायक क्षणी अप्रतिम खेळ करून ७-२ असे चकविले. अन्य सामन्यात उमैर पठाणने जयराज खावादियाचा १९-० असा, कुलदीप चुडासामाने वेदांत पाटणकरचा १३-६ असा, प्रसन्ना गोळेने आयुष दार्वेशीचा १५-१ असा, रेहान शेखने अंश जाधवचा १२-० असा तर नील म्हात्रेने शैलेश यादवचा २५-० असा पराभव करून पहिली फेरी जिंकली.
******************************