मुंबई/NHI NEWS AGENCY/ANAGHA
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील बीएसएनएल बॅडमिन्टन कोर्टवरील महिलांच्या अंतिम सामन्यात स्वातीने १२-१२ अशा बरोबरी नंतर निर्णायक क्षणी अचूक फटके साधले आणि पूजा मोरेचे जोशपूर्ण आव्हान १५-१२ असे संपुष्टात आणून स्वातीने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. परिणामी प्रारंभी आघाडी घेणाऱ्या पूजाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरवसे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या महिला बॅडमिन्टन स्पर्धेची उपांत्य लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. पहिल्या सलग ४ गुणासह डावाच्या मध्यापर्यंत ९-८ अशी आघाडी घेणाऱ्या गरिमा श्रीवास्तवला स्वाती एस. हिने अखेर २१-१३ असे चकवून अंतिम फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढत जिंकताना पूजा मोरे हिने प्रियांका उपाध्यायचा २२-२० असा निसटता पराभव केला. स्पर्धेमधून महिला विभागात स्वाती एस., पूजा मोरे, गरिमा श्रीवास्तव, प्रियांका उपाध्याय आणि पुरुष विभागात ऋषिकेश शिंदे, हनमंत सुद्रिक, प्रमोद जयस्वाल, ऋग्वेद फराडे यांची मुंबई विभागीय संघात निवड करण्यात आली असून १७ व १८ ऑक्टोबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेमध्ये मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशिक्षक सचिन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पंचाचे कामकाज सिध्देश राऊत, आदित्य कीर, साहिल, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण, अर्जुन कालेकर, श्रीधर नार्वेकर, अविनाश महाडिक आदींनी पाहिले.
********************************************************************