मुंबई/NHI NEWS AGENCY
माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ वाढदिवस चषक शालेय-कॉलेज ज्युनियर खेळाडूंच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेत आनंदराव प्लॅटीनियम, आयडियल चँम्पस संघांनी सलामीचे सामने जिंकले. आनंदराव प्लॅटीनियम संघाने अभिजित कॅप्टन्सीचा २-१ असा चुरशीचा पराभव करतांना भव्या सोळंकी व प्रसन्ना गोळे यांनी विजयी खेळ केला. आयडियल चँम्पसने साखळी २ गुण वसूल करतांना अटीतटीच्या लढतीत सुमती फायटर्सला २-१ असे नमविले. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा पत्रकार सुनील सकपाळ, उद्योजक राजन राणे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळ-दहिसरतर्फे को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई व माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लब सहकार्याने माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरु झालेले उद्घाटनीय सामने चुरशीचे झाले. अचूक फटके साधत विवा कॉलेज-विरारच्या भव्या सोळंकीने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या अद्वैत पालांडेचा १९-० असा पराभव करून आनंदराव संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात पोद्दार अकॅडमीच्या पुष्कर गोळेने गौरांग मांजरेकरचा १५-० असा पराभव करून अभिजित संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या निर्णायक सामन्यात प्रसन्ना गोळेने पार्ले टिळक विद्यालयाचा बलाढ्य कॅरमपटू सार्थक केरकरला १४-९ असे नमवून आनंदराव संघाच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब केला. आयडियल संघाला सुमती फायटर्सविरुध्द २-१ असा विजय मिळवून देतांना उमर पठाणने शेख अब्दुलला १७-० असे तर वेदांत पाटणकरने अवैस खानला १५-० असे हरविले. नील म्हात्रेने सुमती संघाला एकमात्र विजय मिळवून देतांना तृशांत कांबळीचा १७-३ असा पाडाव केला.
******************************