मुंबई : श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत गिरीश पवार, अद्वैत पालांडे,भव्या सोळंकी, अवैस खान, गौरांग मांजरेकर आदींनी सलामीचे सामने जिंकले. गिरीश पवारने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत शंभू धुरीचे आव्हान १६-० असे सहज संपुष्टात आणले. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक शैलेश दलाल, भरत नवघरे, जयंती परमार, राशीद सिद्दीकी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील ज्युनियर ४८ खेळाडूंमध्ये कांदिवली-पूर्व येथील कानकश्री सभागृहात चुरशीच्या लढती होत आहेत.
अवैस खान वि. अनय म्हेत्रे यामधील लढत अटीतटीची होऊन ४-४ अशा बरोबरीनंतर अवैस खानने ५-४ अशी बाजी मारली. अमेय जंगमने ४-० असा दमदार प्रारंभ करूनही निर्णायक क्षणी अचूक फटके साधत अद्वैत पालांडेने १४-४ अशी बाजी मारली. भव्या सोळंकीने कौस्तुभ जागुष्टेचा १४-० असा, गौरांग मांजरेकरने झहीर खानचा २५-० असा, कोल्हापूरच्या ओमकार वडारने कुरेशी मोहमदचा १९-० असा, अर्णव गावडेने सुरज लांबोरेचा १७-० असा, समीर खानने दुर्वेश पराडकरचा २५-० असा, सार्थक केरकरने अब्दुल तन्वीरचा २५-५ असा तर वेदांत राणेने मानस नगरकरचा १७-० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
******************************