NHI/NEWS AGENCY/ANAGHA SAKPAL
• आगामी सणासुदीचा हंगाम आणि निवडणूक पश्चात उलाढालींमुळे देशातील महत्वाच्या मार्गावर ट्रक मालवाहतूक दरात वाढ
• भारत-बांगलादेशदरम्यान द्विपक्षीय व्यापार पुर्ववत झाल्याने मालवाहतूक वाहनांच्या वापरात वाढ
मुंबई,: ऑगस्ट 2024 मध्ये ट्रकच्या मालवाहतूक भाडेदरात वाढीचा कल कायम राहीला असून, सलग दुसऱ्या महिन्यात त्यात वृध्दी झाल्याचे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आगामी सणासुदीच्या हंगामामुळे आणि निवडणुकीनंतर आर्थिक उलाढालींच्या वाढलेल्या वेगामुळे विविध वाहतूक मार्गांवर मालवाहतुकीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, भारत-बांगलादेशच्या सीमा प्रदेशात मालवाहतूक वाहन ताफ्याच्या वापरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. वापर 40% वरुन 60% पर्यंत वाढला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार पुर्ववत झाल्याने कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक मालवाहतूक दरात वाढ झाली असून ती सर्वाधिक 3.0% नोंदविली गेली आहे. दिल्ली-कोलकाता-दिल्ली आणि दिल्ली-हैदराबाद-दिल्ली या मार्गांवर देखील अनुक्रमे 2.7% आणि 2.3% वाढ झाली आहे. सफरचंदाचा हंगाम आणि विधानसभा निवडणुक मतदानाअगोदर श्रीनगर भागात मालवाहतुकीचे दरात वाढ सुरु झाली आहे. या भागात ऑगस्टमध्ये मालवाहतुकीचे दर जवळपास 10% वाढले आहे. वायनाड प्रदेशात ट्रकची संख्या घटल्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. तेथे बरेच ट्रक हे पुनर्वसन कार्यात गुंतलेले आहेत.
श्री. वाय. एस. चक्रवर्ती, एमडी आणि सीईओ, श्रीराम फायनान्स लिमिटेड या बुलेटीनबाबत बोलताना म्हणाले, “सणासुदीचा हंगाम जवळ येत चालल्याने भारतातील कंपन्याकडून उत्पादन आणि पुरवठा वाढीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्यामुळे प्रमुख मार्गांवर ट्रक भाड्यात वाढ होत चालली आहे. सफरचंदाचा हंगाम आणि निवडणूकपूर्व घडामोडींमुळे श्रीनगर परिसर खुपच सक्रीय झाल्याने तेथे मालवाहतुकीचे दर वाढत चालले आहे. याव्यतिरिक्त, भारत-बांग्लादेश सीमेदरम्यान व्यापार पुन्हा सुरू झाल्यामुळे या भागात वाहनांच्या ताफ्याचा अधिक वापर होताना दिसत आहे. मात्र, गुजरातमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे वाहतुक क्षेत्रासमोर आव्हाने उभी राहिली आहेत. या परिस्थितीचे निरीक्षण करत असताना, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे प्रांत विनाशकारी पुरातून किती लवकर सावरतील, याबाबत अतिशय सावधतेची भूमिका घेतली जात आहे.”
मोटारकार विक्रीत ऑगस्टमध्ये 6% घट झाली आहे. जुलै 2024 मध्ये 297,623 मोटारकारची विक्री झाली होती. त्या तुलनेत ऑगस्ट 2024 मध्ये विक्री 280,151 वर आली आहे. विक्रीतील घसरणीचे मुख्य कारण झालेली अतिवृष्टी आहे ज्यामुळे गुजरात, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरामध्ये शोरूमला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर परिणाम दिसून आला आहे. याउलट गोवा, केरळ आणि हरियाणामध्ये वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
दुचाकींची विक्रीमध्ये हे आढळून आले आहे की, ऑगस्ट 2024 मध्ये, महिना-दर-महिना तुलनेत विक्रीत 8% घट झाली. तथापि, आगामी सणासुदीच्या हंगामाच्या अपेक्षेमुळे वर्ष-दर-वर्ष तुलनेत विक्री 6% वाढल्याचे दिसून आले आहे.
वापरलेल्या व्यावसायिक वाहनां (यूसीव्ही) च्या बाजाराने सर्व वजन श्रेणींमध्ये वर्ष-दर-वर्ष तुलनेत म्हणजेच गतवर्षाच्या तुलनेत भक्कम वाढ दर्शविली आहे. 31 टन ते 36 टन चार-चाकी युसीव्हीच्या किंमती 12% वाढल्या, तर 3.5 टन ते 7.5 टन श्रेणीच्या किंमतीत 11% वाढ झाली आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये, पेट्रोलचा वापर महिना-दर-महिना तुलनेत 2% वाढला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 8% वाढ दर्शवितो. तथापि, डिझेलचा वापर महिना-दर-महिना तुलनेत 10% कमी झाला असून डिझेलचा एकूण वापर 6.48 मेट्रीक टन इतका नोंदविला गेला आहे. टोल संकलनामध्ये महिना-दर-महिना तुलनेत किंचित वाढ दिसून आली आहे. यात एकूण वाहनांच्या संख्येत (व्हॉल्यूम) वर्ष-दर-वर्ष तुलनेत 7% वाढ तर मूल्यात अर्थात संकलनात 8% वाढ झाली. इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांनी अनुक्रमे वर्ष-दर-वर्ष तुलनेत (YOY) 26% आणि 3% घट नोंदवली. जुलै 2024 मध्ये ई-वे बिलांच्या निर्मितीमध्ये महिना-दर-महिना तुलनेत वाढ झाली.