NHI/NEW AGENCY
गणाधीश चषक आंतर शालेय-कॉलेज ज्युनियर कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड शाळेचा प्रसन्ना गोळे विजेता ठरला. प्रसन्ना गोळेने प्रारंभापासून अचूक फटक्यांसह अप्रतिम खेळ करीत प्रारंभापासून आघाडी साधली आणि रुईया कॉलेजच्या कौस्तुभ जागुष्टेचे आव्हान १०-१ असे संपुष्टात आणून प्रसन्ना गोळेने अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी उपांत्य फेरीपर्यंत उत्तम खेळ करणाऱ्या कौस्तुभ जागुष्टेला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा काळाचौकी येथे मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील ज्युनियर ४० खेळाडूंच्या दर्जेदार खेळाने रंगली. विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्काराने माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, सल्लागार दिलीप वरेकर, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुरुवातीला आघाडी घेऊन दमदार खेळ करणाऱ्या महर्षी दयानंद कॉलेजच्या तनिष गवारेला प्रसन्ना गोळेने १८-५ असे नमविले आणि अंतिम फेरीत धडक दिली. दुसरी उपांत्य फेरी जिंकताना कौस्तुभ जागुष्टेने डॉ. अन्टोनियो दासिल्व्हा हायस्कूलच्या ध्रुव भालेरावचा २३-० असा सहज पराभव केला. स्पर्धेमधील उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार पाटकर विद्यालय- डोंबिवलीचा अनय म्हेत्रे, डॉ आंबेडकर कॉलेजचा अंश जाधव व सुरज कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल-वरळीचा समीर खान यांनी पटकाविला. ज्युनियर कॅरम स्पर्धेचा विनाशुल्क उपक्रम शालेय मुख्य कॅरम स्पर्धांपूर्वी साकारीत असल्याबद्दल क्रीडा शिक्षक व पालकांनी संयोजकांचे कौतुक केले. चँम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी लायन्स डॉ. जगन्नाथराव हेगडे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमी दिलीप वरेकर, स्वप्निल शिंगे, रवींद्र गोनबरे, शुभ्रतो वरेकर, ऋषिकेश शेडगे आदी विशेष कार्यरत होते. पंचाचे कामकाज प्रणेश पवार, चंद्रकांत करंगुटकर व साहिल परुळेकर यांनी पाहिले.