मुंबई/NHI NEWS AGENCY
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या संत ज्ञानेश्वर चषक शालेय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद ईसाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईच्या श्रीशान पालवणकरने पटकाविले. अंतिम सामन्यात पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरच्या ४-० अशा दमदार प्रारंभाला न डगमगता श्रीशान पालवणकरने आक्रमक खेळासह अचूक फटकेबाजी केली आणि श्रीशानने ९-५ अशी बाजी मारून अजिंक्यपदाला गवसणी घातली. ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळ-दहिसर आयोजित विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शालेय ६५ कॅरमपटूनी चुरशीच्या लढती दिल्या.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात सार्थक केरकरने मुलींमध्ये विजयीदौड करणाऱ्या रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचे आव्हान २१-५ असे संपुष्टात आणले. श्रीशान पालवणकरने यजमान ज्ञानेश्वर विद्यालयाच्या ओवैस पठाणला २१-१ असे नमवून अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेतील उपांत्य उपविजेतेद स्वरा मोहिरे व ओवैस पठाण यांनी तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद पोद्दार अकॅडमी-मालाडच्या पुष्कर गोळे व प्रसन्ना गोळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या गौरांग मांजरेकर, ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विशाल सकपाळ यांनी जिंकले. ज्ञानेश्वर विद्यालयाचे सेक्रेटरी सुर्यकांत कोरे व मुख्याध्यापक महेंद्र पाटील, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पंचाचे कामकाज प्रणेश पवार व चंद्रकांत करंगुटकर यांनी यशस्वी केले.
************************************************************